ओमायक्रॉनच्या ८ नव्या रुग्णांची नोंद
महाराष्ट्र दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा हॉटस्पॉट ठरत आहे. शनिवारी राज्यात आठ नवीन ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ३ रुग्ण सातारा, ४ रुग्ण मुंबई तर पुण्यात एका रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या ४८ एवढी झाली आहे.
मुंबईत आढळलेले ४ रुग्णांपैकी एक मुळचा मुंबई येथील असून, इतर ३ छत्तीसगड, केरळ आणि जळगाव येथील आहेत. २ दक्षिण आफ्रिकेतून आले आहेत तर, एकाने टांझानिया येथून प्रवास केला आहे, तर सातारा येथे सापडलेले तीन रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून आले असून, एकाच कुटुंबातील आहेत. तसेच पुण्यातील रुग्ण देखील परदेशातून आलेला आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत ४८ ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी मुंबई १८, पिंपरी चिंचवड १०, पुणे ग्रामीण ६, पुणे शहर ३, सातारा ३, कल्याण डोंबिवली २, उस्मानाबाद १, लातूर १, बुलढाणा १, नागपूर १, वसई विरार १ रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे ४८ पैकी २८ ओमायक्रॉन रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या ६ हजार ९४२ ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णापैकी ६४ लाख ९६ हजार ७३३ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून ९७.७१ टक्के एवढा झाला आहे.
Comments (0)
Facebook Comments (0)