नायजेरीयातून पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या त्या रुग्णाचा मृत्यू हृदयविकाराने; वैद्यकीय विभागाचा दावा
नायजेरियातून आलेल्या एका ५१ वर्षीय रुग्णाचा २८ डिसेंबरला हृदयविकारामुळे मृत्यू झाला. एनआयव्हीने या रुग्णाला ओमायक्रॉनचे प्रासंगिक निदान झाल्याचा अहवाल गुरुवारी दिला. राज्यातील ओमायक्रॉनचा हा पहिला बळी असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण होते. मात्र, या रुग्णाचा मृत्यू ओमायक्रॉनने झालेला नाही, तर हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे, असा दावा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केला आहे.
या रुग्णाला हृदयविकाराचा त्रास झाल्यामुळे वायसीएम रुग्णालयातील रुबी अलकेअर कार्डियाक सेंटर येथे १७ डिसेंबरला दाखल केले होते. १७ डिसेंबरला या रुग्णावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली. १७ आणि १८ डिसेंबरला कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर पुन्हा २० डिसेंबरला कोरोना तपासणी केली. त्यावेळी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर नायजेरियाची पार्श्वभूमी असल्यामुळे या रुग्णाला ओमायक्रॉनची लागण आहे की नाही? याची जिनोम सिकव्हेंन्सी तपासणी करण्यासाठी एनआयव्हीला नमुने पाठविण्यात आले.
हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाची प्रकृती स्थिर होती. परंतु, २७ डिसेंबरला पुन्हा हृदयविकाराचा त्रास झाला. २८ डिसेंबरला हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णाचा मृत्यू झाला. गुरुवारी एनआयव्हीने या रुग्णाला ओमायक्रॉनची प्रासंगिक लक्षणे असल्याचा अहवाल दिला होता. मात्र, या रुग्णाचा मृत्यू हृदयविकारामुळे झाल्याचा दावा महापालिका वैद्यकीय विभागाने केला आहे. या रुग्णाला मागील १३ वर्षांपासून मधुमेह होता. तसेच इतर व्याधींमुळे मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय विभागाचे म्हणणे आहे.
ओमायक्रॉनमुळे या रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, तर हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. तसेच रुग्णाला मधुमेहाचा त्रास होता. नागरिकांनी घाबरून न जाता पुरेशी काळजी घ्यावी. सध्या शहरात ओमायक्रॉनचे ११ सक्रिय रुग्ण असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.
Comments (0)
Facebook Comments (0)